न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. ऑगस्ट २०२०) :- १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच आज शनिवारपासून गणेशोत्सवाच्या मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं आहे. अर्थातच याला कारण ठरत आहे ती म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं उदभवलेली आव्हानाची परिस्थिती.
मागील बऱ्याच महिन्यांपासून कोरोनाशी लढणाऱ्या सर्वांनीच आता मोठ्या मनोभावे आपआपल्या घरात, काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये श्रींची प्रतिष्ठातपना केली आहे. तर, काहींनी मनोभावे या गणरायाला साकडं घालत ‘बा गजानना हे संकट दूर कर’, अशी विनवणी केली आहे.
संपूर्ण देशात आणि अर्थातच परदेशातही अतिशय मंगलमय अशा या पर्वाची सुरुवात झाली आहे. दरम्यान, प्रशासनाकडूनही नियमांचं पालन करत शिस्तबद्दपणे गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उत्सवाचं स्वरुप बदललं असलं तरी नागरिकांच्या मनातील उत्साह मात्र तितकाच आहे.















