न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हें.) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीच्या बैठक मंगळवार (दि.२७) रोजी स्थायी समिती सभापती यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात एकूण १७ कोटी १५ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. प्रभाग क्र.१२ च्या काळभोर नगर शाळा क्र. २ /२ येथील सिमाभिंतीची उंची वाढविणे. पेव्हिंग ब्लॉक बसविणे व देखभालीची कामे करण्यासाठी ५२ लाख १६ हजार रुपयांची मान्यता दिली.
तसेच प्रभाग क्र. १३ राहुलनगर व श्रमिकनगर मधील जुन्या जलनि:सारण व्यवस्थेमध्ये सुधारणेकामी एकूण ५० लाख ८७ हजार, प्रभाग क्र. ५ शास्त्री चौक, जय महाराष्ट्र चौक, हुतात्मा चौक परिसरात मलवाहिनीची सुधारणा कामे करणेकामी ३१ लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास, कासारवाडी, केशवनगर, हिराबाई लांडगे झोपडपट्टी व उर्वरित परिसरातील आवश्यक त्या ठिकाणी जलनि:सारण नलिकांमध्ये सुधारणा करणेकामी एकूण ३३ लाख १९ हजार रुपयांच्या खर्चास तसेच क प्रभागातील जुन्या मलनि:सारण नलिका बदलण्यासाठी एकूण ३१ लाख ९२ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
पिंपळे निलख येथील जगताप डेअरी चौक ते पिंपळे सौदागर याठिकाणच्या शिवार चौक येथील रस्त्याचे ४५ मीटर रूंदीकरण सुरू आहे. मात्र, संरक्षण विभागाची जागा ताब्यात नसल्याने हे काम अडविण्यात आले होते. ही जागा ताब्यात देण्यासाठी महापालिकेने २ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम संरक्षण विभागाला अदा करण्यास आज स्थायी समितीने मंजुरी दिली.










