न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २२ जुलै २०२६) :- बॅनर लावण्याच्या चर्चेतून झालेल्या वादात एका २६ वर्षीय तरुणाला हाताने व खुर्चीने मारहाण केल्याची घटना रावेत येथील बीआरटी रोडवरील आर.जे. कॅफेजवळ घडली. या प्रकरणी रावेत पोलिसांनी चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रावेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार दिलीप खिलारे (वय २६, रा. साईनाथनगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आकाश राऊत, अक्षय हिप्परकर, आदित्य (पूर्ण नावे व पत्ते अपूर्ण) आणि ‘बुट्या’ (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही घटना २० जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४० वाजता मुकाई चौक ते भक्ती-शक्ती चौक बीआरटी रोडवरील एचपी पेट्रोल पंपाजवळील आर.जे. कॅफेमध्ये घडली. फिर्यादी आणि त्यांचा मित्र अनिस हे बॅनर लावण्यासंदर्भात चर्चा करत असताना शेजारच्या टेबलवर बसलेल्या आरोपींनी “तुमची लायकी आहे का, तुम्ही बॅनर लावू शकता का?” असे म्हणत शिवीगाळ सुरू केली.
फिर्यादी यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केल्यानंतर चौघांनी त्यांना हाताने तसेच खुर्चीने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला आणि डाव्या हाताच्या दोन बोटांना दुखापत झाली. तसेच आरोपींनी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आवारे करीत आहेत.
















