- आळंदी नगरपरिषदेचे महापालिका आयुक्तांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५. ऑगस्ट. २०२०) :- करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मोशी, डुडुळगाव व च-होली भागातील नागरिकांच्या गणेशमूर्तीचे आळंदी येथील इंद्रायणी घाटावर विसर्जन होऊ नये, याकरिता खबरदारी घ्यावी. त्याकरिता जनजागृती करावी, असे निवेदन आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी महापौर उषा ढोरे यांना दिले आहे.
याची दखल घेत, महापौर कार्यालयाच्या वतीने आयुक्त कार्यालयाला सूचना करत कार्यवाही करण्याचे पत्र दिले आहे. आळंदी नगर परिषदेला लागूनच पिंपरी – चिंचवड महापालिकेची हद्द आहे. पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीतील च-होली, डुडुळगाव, मोशी, मॅगझीन चौक, एमआयडीसीतील कंपन्यांमधील गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी नागरिक आळंदीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर गर्दी करत असतात.
यंदा पिंपरी चिंचवड शहराबरोबरच आळंदीत करोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासन पातळीवर विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. आळंदीतील घाटांवर गणेशमूर्ती विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची माहिती महापालिका हद्दीतील गणेशभक्तांना करून देण्यासाठी जनजागृती करावी, अशी माणणी या निवेदनात केली आहे.
—















