- यापुढे दिशाभूल करणारी माहिती दिल्यास पालिकेकडून कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१. ऑगस्ट. २०२०) :- काही नागरिक कोरोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी खोटा अथवा चुकीचा पत्ता, नांव, भ्रमणध्वनी क्रमांक देत असल्याने महापालिकेकडून राबविण्यात येणा-या उपाययोजना आणि कोरोना विषाणुंचा प्रसार रोखण्यामध्ये बाधा निर्माण होत आहे. अशी दिशाभूल करणारी माहिती देणा-या व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी नियमाधिन कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रभावीपणे उपाययोजना राबवित आहे. कोरोनामुळे दगावणा-यांचे प्रमाण नियंत्रणात आहे. ते अजून आटोक्यात आणण्यासाठी तसेच वाढता कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि यंत्रणेची नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने आज पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आयुक्त हर्डीकर यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या आणि भविष्यात करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रविण तुपे, उपायुक्त अजय चारठणकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी जितेंद्र कोळंबे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त सुनील अलमलेकर यांच्यासह सर्व क्षेत्रिय अधिकारी तसेच महापालिका रूग्णालयांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
कोरोना सदृश्य लक्षणे असणा-या व्यक्तींच्या महापालिका रूग्णालये अथवा खाजगी रूग्णालयांमार्फत चाचण्या करण्यात येत आहेत. शिवाय कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यास या रूग्णाच्या संपर्कात येणा-या इतर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय उपचार, तपासण्या, चाचण्या अथवा मार्गदर्शनपर सुचना करण्याचा महापालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. या सर्व प्रक्रियेत नागरिकांचे उत्तम सहकार्य मिळत आहे. मात्र काही नागरिक कोरोना संबंधित चाचण्या करण्यासाठी गेल्यावर त्याठिकाणी खोटा अथवा चुकीचा पत्ता, नांव, भ्रमणध्वनी क्रमांक देत असल्याने प्रभावीपणे उपाययोजना राबविण्यात आणि कोरोना विषाणुंचा प्रसार रोखण्यामध्ये बाधा निर्माण होत आहेत. असे चुकीचे पत्ते, भ्रमणध्वनी क्रमांक अथवा दिशाभूल करणारी माहिती देणा-या व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी नियमाधिन कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खरी माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी यावेळी केले.
यावेळी आयुक्त हर्डीकर यांनी उपस्थित अधिकारी आणि रूग्णालय प्रमुखांच्या कोरोना विषाणू नियंत्रण कामकाजाबाबत अडचणी आणि मते जाणून घेतली. सामुहिक कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता महापालिका यंत्रणा सक्षमतेने कार्यान्वित असणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी बैठकीमध्ये सुचना दिल्या. शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकानांमध्ये व्यापारी तसेच कामगारांच्या कोरोना चाचण्या, घंटागाडी कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्यादेखील कोरोना संबंधित तपासण्या होणे आवश्यक आहे. गावठाण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या.
तसेच औद्योगिक उद्योगांनी त्यांच्या अधिनस्त कर्मचा-यांच्या कोरोना संबंधित तपासण्या करण्यासाठी प्राधान्य देऊन कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्या साठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी केले.














