न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- टिलीमिली या महामालिकेचे पहिली ते चौथी या इयत्तेसाठीचे १९२ भागांचे प्रसारण दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून १ सप्टेंबरपासून प्रसारित केले जाणार आहे. हसतखेळत, आनंददायी शिक्षण असलेली ही मालिका आहे.
कोरोना संकटामुळे १४ मार्चपासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. शिक्षणाची आपत्कालीन दर्जेदार पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी या इयत्तांसाठी पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या वाहिनीवरून दैनंदिन मालिकेद्वारे मोफत देण्याचे ठरवले आहे.
या उपक्रमात ग्राममंगल आणि इतर संस्थांचा, तज्ज्ञांचा सहभाग आहे. या मालिकेचे नाव टिलीमिली असे आहे. ही मालिका २० जुलैपासून सुरू आहे. ५ वी ते ८ वी पर्यंतच्या इयत्तांचे भाग ३१ ऑगस्ट रोजी संपले आहेत. आठही इयत्तांसाठी ४८० एपिसोड हात असलेली ही मालिका रविवार वगळता रोज प्रसारित होत आहे. २८ सप्टेंबर रोजी ही मालिका समाप्त होईल.














