न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. सप्टेंबर. २०२०) :- मंदिरे, चर्च, गुरुव्दारा, मस्जिद, प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी राज्यभरातील नागरिकांची, भाविकांची मागणी वाढत आहे. या लोकभावनेचा आदर करीत सोमवारी विश्व वारकरी संघटना व वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. राज्याचे लक्ष लागून असलेल्या या आंदोलनाची शासनाने दखल घेतली. येत्या ८ ते १० दिवसांत शासनाकडून नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वमंदिर, मस्जिद, गुरुव्दारा, प्रार्थनास्थळे भाविकांना दर्शनाकरिता खुली होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
मात्र दहा दिवसांत मंदिर खुले न केल्यास पुन्हा पंढरपूरात येऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी शासनाला दिला.
श्री विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेल्यानंतर मंदिराबाहेर आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी चौक येथे आंदोलकांसमोर बोलताना आठ दिवसांत मंदिरे खुली होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
आंबेडकर म्हणाले की, आम्हाला खात्री नव्हती की मंदिर उघडतील. जास्तीत जास्त नामदेव पायरीपर्यंत सोडतील. तेथून परत यावे लागेल. मात्र आम्हीदेखील मंदिरात जाणारच यावर ठाम होतो. शासन आमची वाट पाहात होते की आंदोलक येथून जातील, पळतील. मात्र आम्ही हललो नाही, गेलो नाही. तेव्हा याची दखल घेऊन १५ आंदोलकांना जाण्यास परवानगी दिली. मंदिर, मस्जिद, गुरुव्दारामध्ये जाण्यासाठी नियमावली तयार करावी लागेल. मंदिरात कशी दर्शन व्यवस्था करायची हे ठरवावे लागेल. नियमावली तयार करण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी लागेल, असे शासनाकडून सांगण्यात आले. आम्ही ८ ऐवजी १० दिवस वाट पाहू मात्र मंदिरे खुली करा, असे आम्ही शासनातील संबंधितांना सांगितले तेव्हा त्यांनी मंदिरे खुली झाली, असे समजा असा शब्द दिला आहे.














