न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) :- ना ढोल ताशांचा दणदणाट … ना आसमंत दुमदुमून टाकणारा गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष … ना आकर्षक विसर्जन रथ … ना मिरवणूक … गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेशभक्तांनी अतिशय साध्या पद्धतीने परंतु जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
पिंपरी – चिंचवड शहरात करोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढण्यास, विसर्जन घाटावर जाऊन विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आली होती.
यामुळे अनेक नागरिकांनी शाडूच्या मूर्तीना प्राधान्य दिले आणि घरातच तसेच गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात मूर्तीचे विसर्जन केले. तर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ५५ हजारांहून अधिक गणेशमूर्ती संकलित करण्यात आल्या होत्या. या मूर्तीचे संस्कार प्रतिष्ठान आणि महापालिकेच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले.














