- बालेवाडी कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे जबरदस्तीने १० दिवस अलगीकरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) :- महापालिकेच्या वायसीएम तसेच इतर विविध हॉस्पिटलमधून तसेच पुण्यातील विविध हॉस्पिटलमधून कमी वा काहीच लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना किंवा केवळ संपर्कात आलेल्या व्यक्तींना विलगीकरण (Quarantine) म्हणून बालेवाडी येथील कोविड केअर केंद्रात आणले जाते. तेथे जबरदस्तीने आणलेल्या दिवसापासून १० दिवस ठेवले जात आहे. हे खूपच चुकीचे आहे. मुळात राज्य सरकारने कमी वा काहीच लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना १४ दिवसांऐवजी ७ दिवस विलगीकरणासाठीची मर्यादा अंतिम केली आहे.
असंख्य नागरिकांना काहीही लक्षणे नसताना तसेच सौम्य लक्षणे असताना त्यांना ४-५ दिवसात किंवा त्यांच्या मर्जीने बरे वाटत असल्यास तसेच त्यांच्या घरी, फ्लॅटमध्ये स्वतंत्र रूम असल्यास घरी सोडले पाहिजे, जेणेकरून त्यांचे घरून काम करण्याचे वा इतर नुकसान होणार नाही.
परंतु, सर्रास बालेवाडी इथे आणल्यानंतर तिथून पुढे १० दिवस जबरदस्तीने तिथेच ठेवायला लावणे, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे निदान ज्यांच्याकडे स्वतंत्र रूमची सोय घरात वा फ्लॅटमध्ये आहे, त्यांना तर त्यांच्या मर्जीप्रमाणे घरी सोडले पाहिजे. तसेच वायसीएम वा इतर हॉस्पिटलमधून बालेवाडी इथे आणताना अश्या जाचक १० दिवसांच्या विलगीकरणाबद्दल पूर्ण माहिती संबंधित रुग्णांना देणे अतिशय आवश्यक आहे. ज्यामुळे ते बालेवाडी इथे जायचे का नाही याचा निर्णय घेऊ शकतील.. त्यामुळे पालिकेने सौम्य व लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांना बालेवाडी येथे आणल्यानंतर त्यांच्या घरी स्वतंत्र खोलीची सोय असल्यास ७ दिवसानंतर त्यांना घरी सोडण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी पिंपरी चिंचवड व पुणे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.














