- सविस्तर वाचा झालेले बदल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- जमिनीची मालकी सिद्ध करणारा महत्वाचा कागद असलेल्या सातबाऱ्यात तब्बल पन्नास वर्षानंतर बदल करण्यात आले आहेत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवा सातबारा संगणकीय आणि नागरिकांना सहज समजेल अशा भाषेत असणार आहे. या संदर्भातील अध्यादेश शासनाने प्रसिद्ध केला असून महसूल यंत्रणा हे बदल करणार आहे.
ई – फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले की, या नवीन सातबाऱ्यात विविध प्रकारचे ११ बदल सुचविण्यात आले आहे. सातबा-यावर प्रथमच महाराष्ट्र शासनाचा लोगो, गावाचा बार कोड आणि क्युआरकोड येणार आहे. सातबारा समजून घेणे अनेकांच्या आवाक्याबाहेरचा विषय असतो. सातबा-यावरील नोंदी व त्यावरुन निर्माण होणाऱ्या अडचणी हा गंभीर विषय असतो. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने ब्रिटीशकालीन सातबारा बदलला आहे.
गाव नमुना नं. ७ मध्ये अ) लागवडीयोग्य क्षेत्र ब) पोट खराब क्षेत्र या सोबत एकूण क्षेत्र ( अ + ब ) दर्शविण्यात येईल. नमुना ७ मध्ये नमूद क्षेत्राचे एकक काय हे समजण्यासाठी क्षेत्राचे एकक हा स्वतंत्र रकाना समाविष्ट करण्यात येत आहे.
यात शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक वापरले जाईल. नमुना ७ मध्ये खाते क्रमांक या पूर्वी इतरहक्क रकान्यासोबत नमूद केला जात असे तो आता खातेदार / खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाईल.
नमुना ७ मधील मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजे अथवा ई – कराराच्या नोंदी कंस करुन दर्शविल्या जात होत्या, आता ती कमी केलेली नावे व नोंदी कंस करुन त्यावर एक आडवी रेषामारुन खोडून ( strike through ) दर्शविण्यात येतील. कोणत्याही नमुना ७ वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले फेरफार ( प्रलंबित असे पर्यंत ) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येतील. संबंधित भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांकावर एकाही फेरफार प्रलंबित नसल्यास प्रलंबित फेरफार नाही, असे दर्शविण्यात येईल.
कोणत्याही नमुना ७ वर नोंदविण्यात आलेला शेवटचा फेरफार क्रमांक व त्याचा दिनांक इतरहक्क रकान्याचे खाली शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या नवीन रकाना समाविष्ट करुन दर्शविण्यात येईल. फेरफार घेण्याची प्रक्रिया ई फेरफार प्रणालीद्वारे ऑनलाईन सुरु झाल्यापासून एखद्या स.नं / गट नं . वर एकही फेरफार नोंदविला नसल्यास शेवटचा फेरफार क्रमांक व दिनांक या रकान्यात काहीही दर्शविले जाणार नाही.
नमुना ७ वरील सर्व जुने फेरफार क्रमांक नमुना ७ वर सर्वात शेवटी जुनेफेरफार क्रमांक या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शविण्यात येतील. ‘ शेती व बिनशेती क्षेत्रासाठी स्वतंत्र गाव नमुने थोडासा बदल करुन दर्शविण्यात येतील. बिनशेतीच्या ७ / १२ मध्ये पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी तसेच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येतील. नमुना ७ मधील कोणत्याही दोन खात्यातील नावांचे मध्ये डॉटेड लाईन छापण्यात येईल त्यामुळे खातेदारांचे नावामध्ये अधिक स्पष्टता येईल. बिनशेती क्षेत्राचे नमुना ७ साठी नमुना १२ ठेवणे आवश्यक नसल्याने बिनशेती क्षेत्रासाठी नमुना १२ छापला जाणार नाही. सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरीत झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न.१२ ची आवश्यकता नाही अशी सूचना छापण्यात येईल.














