- प्रत्येक बस दिवसातून दोन वेळा सॅनिटाईज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेली पीएमपीची बससेवा गुरुवारपासून सुरु झाल्यामुळे भोसरीतील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भोसरीतून पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या ३३ बस २५ मार्गावर धावणार आहेत. प्रत्येक बस दिवसातून दोन वेळा सॅनिटाईज करण्यात येणार आहे, अशी माहिती भोसरीचे डेपो व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी पुणे, पिंपरी चिंचवड शहरामधील पीएमपीची बस वाहतूक बंद होती. अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्यांनतर पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहरामधील जनजीवन सुरळीत होताना दिसत आहे, परंतु सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे पीएमपीची सेवा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.
३ सप्टेंबरपासून बससेवा सुरु असल्याने भोसरी परिसरातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भोसरीतून चाकण एमआयडीसी, हिंजवडी, पुणे स्टेशन परिसरात कामासाठी जाणारा मोठा वर्ग आहे. बससेवा सुरु झाल्याने कामगारांना बसने ये – जा करणे सुलभ होणार आहे. भोसरी डेपोमधून राजगुरुनगर, कात्रज, हिंजवडी आणि पुणे स्टेशन हे महत्त्वाचे मार्ग सुरु करण्यात आले आहेत. २५ टक्के संचलनानुसार ३३ बस डेपोतून धावतील. गर्दीच्या वेळेनुसार बसच्या फे-या ठरविण्यात आल्या आहेत. एकूण २५ मार्ग यामध्ये संचलन होतील. कर्मचायांना ७ दिवस काम आणि ७ दिवस आराम असे नियोजन करण्यात आले.














