रुग्णालयात सर्व रुग्णांसाठी एकच प्रवेशद्वार; ४८ तासांत खुलासा करा – एन.अशोक बाबू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४. सप्टेंबर. २०२०) :- रहाटणी येथील फिनिक्स हॉस्पिटलला कोरोना बाधित रुग्णांकडून महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारल्याबद्दल एन.अशोक बाबू,सह आयुक्त, आयकर विभाग, पुणे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून याबाबत नोटीस मिळालेपासून ४८ तासांत खुलासा करणेबाबत कळविले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयामध्ये कोविड-१९ या आजाराने बाधित झालेल्या रुग्णांची येणारी वैद्यकीय खर्चाची बिले हि अवास्तव रकमांची येत आहेत. याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्याने रुग्णालयांनी आकारलेली खर्चाची बिले हि महाराष्ट्र शासनाने निश्चित केलेल्या दरांनुसार असल्याबाबतची तपासणी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने श्री. एन.अशोक बाबू, सह आयुक्त, आयकर विभाग, पुणे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या समितीने रहाटणी येथील फिनिक्स हॉस्पिटलकडील १६ रुग्णांच्या वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता शासन निश्चित दरांपेक्षा जास्त दराने वैद्यकीय बिल आकारणी केल्याचे आढळून आल्याने हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.
एन.अशोक बाबू यांच्या वैद्यकीय समितीने फिनिक्स हॉस्पिटलला भेट देऊन तेथील वैद्यकीय बिलांची तपासणी केली असता हॉस्पिटलने अॅडमिनीस्ट्रेशन, बेड चार्जेस, आयपीडी, इसीजी, २ डी इको, पथोलॉजी चार्जेस, एक्स रे चार्जेस शासन निश्चित दरांपेक्षा जास्त आकारल्याचे दिसून आले. तसेच विमा संरक्षित रुग्णाकडून जादा रक्कम घेणे तसेच कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या शासनाच्या सूचना असताना देखील हॉस्पिटलमध्ये सर्व रुग्णांसाठी एकच प्रवेशद्वार असल्याचे समितीस आढळून आले. त्याबाबत देखील रुग्णालय प्रशासनाला तातडीने दोन स्वतंत्र प्रवेशद्वार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आदीबाबत देखील हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
शासनाने कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी निश्चित केलेले दरपत्रक रुग्णालयामध्ये दर्शनी भागामध्ये लावण्याच्या सूचना दिल्या असताना देखील हॉस्पिटल प्रशासनाने शासनमान्य दरपत्रक दर्शनी भागात लावले नसल्याचे वैद्यकीय समितीला आढळून आल्याने रुग्णालय प्रशासनाला दरपत्रक लावण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधित रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी ज्यादा वैद्यकीय बिल आकारले असल्यास याबाबत रुग्णांनी medicalbillaudit@pcmcindia.gov.in व medical@pcmcindia.gov.in या ईमेल वर तसेच ८८८८००६६६६ या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.














