ठरावाची अंमलबजावणी १५ दिवसात होणे आवश्यक, तरच नागरिकांना दिलासा – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे पिं. चिं. शहरवासीय आर्थिक संकटात सापडले आहेत. दैनंदिन खर्चासाठीसुद्धा येथील रहिवाशी नागरिकांची ससेहेलपाट सुरू आहे. त्यातच कोरोना बाधितांनी ४ सप्टेंबरपर्यंत ५३००० चा आकडा पार केला आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याची घडी सुद्धा विस्कटलेली आहे. अश्या गंभीर परस्थितीत नागरिकांना मिळकत करातून सूट मिळणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावरून कराचा बोजा कमी होणार आहे. या मिळकत कराचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील, माजी उपमहापौर चिंचवडे हे एकत्रितपणे गेल्या महिन्याभरापासून प्रयत्नरत होते. त्यांच्या ह्या लढ्यास आता यश मिळताना दिसून येत आहे.
दि. २० ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक चिंचवडे यांनी उपस्थित राहून मिळकतकर माफी संदर्भात महापौर कक्षात लेखी पत्र जमा केले होते. तसेच प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीसोबत वेळोवेळी मिळकतकर माफ करण्यासंदर्भात बैठकाही घेतल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रशासनास त्याबाबत विनंतीही करण्यात आली. तदनंतर शहरवासीयांना या अडचणीच्या काळात आर्थिक सहकार्य म्हणून २६ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत सहा महिण्यांकरिता मिळकत कर माफीचा ठराव उपसूचना मांडून मंजूर करण्यात आला.
या संदर्भात प्रतिक्रिया देताना नगरसेवक चिंचवडे म्हणाले,” सहा महिन्याकरिता मिळकतकर माफीचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर होणे नक्कीच जनतेसाठी दिलासा ठरणारी बाब आहे. परंतु सदरच्या ठरावास मूर्त स्वरूप तातडीने प्राप्त होणे आवश्यक आहे. राज्य शासनाकडे पाठपुरावा करून सर्वसामान्यांना मिळकत करातून सुट तातडीने कशी मिळेल हे पाहणे आता सर्वच लोकप्रतिनिधींची जबाबदारी असणार आहे. याकरिता लवकरच आम्ही मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना पत्रव्यवहार करून कर कमी करण्यासाठी साकडे घालणार आहोत.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” आपले पिंपरी चिंचवड शहर कोरोनाच्या विळख्यात सध्या अडकलेले आहे. कामगारनगरी ची आर्थिक चाके त्यामुळे पूर्णतः खिळखिळी झालेली आहेत. उद्योग नगरीतील बरेच छोटे मोठे उद्योगही ठप्प झालेले आहेत. अशा कठीण काळात मिळकत कर भरण्यासाठी नागरिकांकडे पैश्यांची उपलब्धताच नव्हती. त्यामुळे महापालिकेने रहिवाशी नागरिकांना मिळकत करामध्ये सहा महिन्यांकरिता माफी असा ठराव बहुमताने मंजूर करून काही अंशी दिलासा दिलेला आहे. परंतु मंजूर झालेला ठराव तातडीने म्हणजेच येत्या १५ दिवसात तातडीने आमलात येणे आवश्यक आहे. तरच नागरिकांना पूर्ण दिलासा प्राप्त होईल. कोविड काळात मिळकत कराचा विषय राजकारण विरहित असावा.”














