वकीलांना पूर्णवेळ कोर्ट सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- कोरोनामुळे न्यायालयातील कामकाज १५ सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये सुरू राहणार आहे. न्यायालयातील कामकाजाची वेळ वाढवण्याची मागणी करणाऱ्या वकीलांना कोर्ट सुरू होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे २३ मार्चपासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊनपासून न्यायालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
२३ मार्चपासून न्यायालयातील कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरु आहे. त्यामुळे वकिलांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. न्यायालयाच्या कामकाजाची वेळ, न्यायाधीशांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी बार असोसिएशनने केली होती. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाला पुणे बार असोसिएशनतर्फे पत्र पाठवण्यात आले होते. त्यामुळे या महिन्यात न्यायालयातील कामकाज पूर्णवेळ सुरु होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, या महिन्यातही न्यायालयाचे कामकाज एकाच शिफ्टमध्ये सुरु राहणार आहे.
न्यायालय सुरु करण्याबाबत जिल्ह्यातील वकिलांनी आपले मते नोंदवली आहेत. त्याचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला पाठवण्यात आला असून, उच्च न्यायालयाने त्याबाबतची माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीला दिली आहेत. त्यावर विचार निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे १५ सप्टेंबरनंतर ही परिस्थिती बदलू शकते, असे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले.














