- राज्य सरकारचा महामेट्रोस अल्टिमेटम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- कोरोना टाळेबंदीमुळे रखडलेल्या मेट्रोचे दोन्ही प्राधान्य मार्ग येत्या ६ महिन्यात सुरु झाले पाहिजेत असा ‘ अल्टिमेटम ‘ राज्य सरकारने दिला आहे. पिंपरी – चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी अशा ३१ किलोमीटर अंतराच्या दोन मेट्रो मार्गाचे काम २ वर्षांपासून सुरू आहे. यात पिंपरी ते फुगेवाडी व वनाज ते गरवारे महाविद्यालय हे प्रत्येकी किलोमीटरचे मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित करण्यात आले आहेत.
हे मार्ग सहा महिन्यात सुरु करण्याची सूचना अजित पवार यांनी मेट्रो प्रशासनाला केली आहे. महामेट्रोचे संचालक (प्रकल्प) अतुल गाडगीळ यांनी यास दुजोरा दिला. या दोन्ही मार्गाचे काम गतीने सुरू होते, मात्र कोरोना टाळेबंदीमुळे ते चार महिने रखडले. आता ते परत सुरू झाले आहे.
पिंपरी ते फुगेवाडी या मार्गाची मेट्रो कोचसहित चाचणीही झाली आहे. वनाज ते गरवारे मार्गावर एसएनडीटी महाविद्यालयाच्या वळणाजवळ थोडे काम बाकी आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय स्थानकांची कामे अपूरी असली तरी दोन्हीकडचे मेट्रो मार्ग ९० टक्के पुर्ण झाले आहेत. पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर सिग्नलिंग यंत्रणाही बसवली आहे. वनाज ते गरवारे मार्गावरही लवकरच मेट्रो कोचसह चाचणी घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे हे दोन्ही मार्ग विहित मुदतीत सुरु करणे शक्य असून त्याप्रमाणे सर्व कामांचे नियोजन केले असल्याचा दावा मेट्रो प्रशासनाने केला आहे.














