- नेहरूनगरच्या जम्बो रुग्णालयाची महापौर व पक्षनेत्यांकडून पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. सप्टेंबर. २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथील ऑक्सिजनयुक्त २०० बेड क्षमतेच्या कोरोना तात्पुरत्या रुग्णालयात शुक्रवारी (दि. ४) १२ रुग्ण दाखल करण्यात आले. नेहरूनगर येथील जम्बो रुग्णालयाची पाहणी महापौर उषा ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी केली. रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, नोडल अधिकारी सुनील अलमलेकर आदी अधिकारी उपस्थित होते. शहरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव व रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोना रुग्णांसाठी वेळीच ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे ५० आयसीयू व १५० ऑक्सिजन हे बेडचे रुग्णालय बांधण्यात आले आहे.
शासनाच्या माध्यमातून नेहरूनगरच्या अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे ८१६ बेडचे जम्बो रुग्णालय मंगळवार (दि. १) कार्यान्वित करण्यात आले आहे. पुणे शहरात घटलेली घटना लक्षात घेऊन येथे दाखल होणाऱ्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत. रुग्णांसाठी असलेल्या सुविधांमध्ये कामचुकारपणा होणार नाही. रुग्णांची हेळसांड होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर औषध, लॅब, ऑक्सिजन पुरवठा वेळेत उपलब्ध करून देण्याचे सक्त आदेश संबंधित खासगी रूणालयाचे व्यवस्थापक, अतिरिक्त आयुक्त पाटील, पालिकेचे नोडल अधिकारी अलमलेकर यांना महापौर ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे यांनी दिले. तसेच कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा देण्याचे कामही डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी करावे अशा सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर व कोल्हापूर महापालिका आयुक्त यांनी ऑटो क्लस्टर येथील कोरोना रुग्णालयाची पाहणी करून नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले, अशी माहिती महापौरांनी दिली. रुग्णालय टप्प्याटप्प्याने सुरू नेहरूनगरच्या ऑक्सिजनयुक्त ८१६ बेडच्या जम्बो रुग्णालयाचे व्यवस्थापन मेडब्रो या संस्थेला देण्यात आले आहे. येथे टप्प्याटप्प्याने रुग्णांना दाखल करून घेतले जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
पहिल्या टप्यात १७५ नंतर ४०० रूग्णांना प्रवेश दिला जाणार आहे. सुरळीतपणे सुविधा व व्यवस्थापन सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने रूग्णांना दाखल करून घेऊन उपचार दिले जातील. असे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.














