न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज पार पडली. कोरोना विषाणूचा सर्वत्र फैलाव झालेला असल्याने त्याचा प्रादुर्भाव पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढतच असल्याने प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यासाठी सभेत खर्चास मान्यता देण्यात आली.
ऑटोक्लस्टर येथील १५० बेडस् व ५० आय.सी.यु. बेडस् साठी व रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी लागणारे किटस् यासाठी ७ कोटी ४८ लाख रकमेच्या खर्चासह आजच्या सभेत विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे ६५ कोटी २३ लाख रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
पिंपळे सौदागर येथील पवना नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी सुमारे १२ कोटी ३१ लाख रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. आज झालेल्या सभेमध्ये माजी राष्ट्रपती प्रणम मुखर्जी, पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे, महाकाय दुर्बिणीचे जनक गोविंद स्वरुप, माजी नगरसेवक साहेबराव खरात, तसेच कोरोना मुळे मृत्यू पावलेले शहरातील नागरिक व मनपा कर्मचारी यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.















