- कोरोनाने मृत पावलेल्या मृतदेहाऐवजी दिला भलत्याचाच मृतदेह..
- नातेवाईकांचा संताप अनावर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. शहरात दररोज हजारो रुग्ण आढळून येत असून कोरोना मृत्यूही वाढलेले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य शासन व पालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांना कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, खासगी रुग्णालये याबाबत अधिक गंभीर नसल्याचे पाहवयास मिळत आहे. आज बुधवारी चिखलीतील गुंजकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाऐवजी भलताच मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्याचा प्रताप रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
मृताच्या नातेवाईकाने याबाबत माहिती देताना सांगितले की, राजाराम घाटगे (वय ६२ वर्षे) यांना श्वास घ्यायला त्रास झाल्यामुळे चिखलीतील गुंजकर रुग्णालयात दाखल केले. गेल्या दहा दिवसापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, आज पहाटे पाच वाजता त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना सांगितले. रुग्णालयाने दुपारी एक वाजता मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यासाठी मृतदेह नातेवाईक व वायसीएममधील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिला. त्यावेळी मृतदेह व्यवस्थित गुंडाळलेला नव्हता तसेच त्याला लेबलसुद्धा नव्हते, पीपीई कीट व पॉलीथीन वेस्टनाऐवजी मृतदेहावर फक्त वरून कव्हर लावलेला होता. त्यामुळे नातेवाईक व वायसीएममधील कर्मचाऱ्यांना संशय आला. रुग्णालय प्रशासनाला वरील बाब कळविल्यानंतर त्यांनी सुरुवातीला हुजत घातली. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात मोठा जनसमुदाय जमा झाला होता. त्यानंतर रुग्णालयाने संबंधित मयताचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
या रुग्णालयाने कोरोनावर उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या उपचाराच्या खर्चाची मर्यादादेखील ओलांडली आहे. तब्बल तीन लाखांच्यावर उपचाराचे बिल संबंधित रुग्णालयाने नातेवाईकांना दिले. याची देखील पालिकेकडे तक्रार करणार असल्याचे रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.