न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० सप्टेंबर. २०२०) :- शहरातील दोन्ही जम्बो कोविड सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरु झाले. त्यामध्ये पहिल्याच आठवड्यात ऑटो क्लस्टरमधील सेंटरमध्ये ९५ व मगर स्टेडियम येथे सुमारे ३५० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २५ पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जम्बो सेंटर नियंत्रण समितीचे अध्यक्ष व अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.
पुणे महानगर विकास प्राधिकरण ( पीएमआरडीए ) , पुणे व पिंपरी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मगर स्टेडियम येथे सुमारे ८१६ बेडच्या क्षमतेचे जम्बो कोविड सेंटरचे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन उद्घाटन केले. त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहेत. त्याप्रमाणे पिंपरी महापालिकेने ऑटो क्लस्टर येथे सुमारे २०० बेडची क्षमता असलेले रुग्णालय उभारले आहे. मात्र , दोन्ही जम्बो सेंटर उशिरा सुरु झाल्याने त्यावर टीका करण्यात आली होती. मात्र , सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दोन्ही जम्बो सेंटरमध्ये टप्याटप्याने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामध्ये ३० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुढील दोन आठवड्यात रुग्णांची संख्या वाढल्यास जम्बो सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आवश्यक ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, व्हेंटिलेटरची उपलब्धता केली जात आहे.