- आम्हाला विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने काम सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. सप्टेंबर. २०२०) :- भोसरीमधील वाहतूककोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासठी अर्बन स्ट्रीट करण्याचे प्रस्तावित असून, मात्र याला आता येथील व्यापारी व स्थानिक नागरिक व नगरसेवकांनी विरोध केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता मनमानी पध्दतीने हे काम सुरू असून, आमचे म्हणणे ऐका, आमच्या मागण्या मान्य करा असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याबाबत नुकतीच भोसरीमध्ये बैठक पार पडली.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, नगरसेवक रवी लांडगे, व्यापारी कैलास भाबुर्डेकर, नथु शिदे, भानुदास लांडगे, मदन कर्नावट, राम फुगे, संजय उदावंत, स्थानिक नागरिक अजित रमेश गव्हाणे, बाळासाहेब लांडगे, हेमंत खराबे, अविनाश फुगे, कैलास लांडगे, दत्तात्रेय गव्हाणे व अजित फुगे, सागर काकडे तसेच इतर अनेक व्यापारी उपस्थित होते.
भोसरी पुलाखाली वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार आता या भागातील पादचाऱ्यांचा, नागरिकांच्या सोयीच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते, अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करण्यात येणार आहेत. विदेशातील वाहतूक व्यवस्थेच्या धर्तीवर भोसरी उड्डाण पुलाखालील वाहतुकीचे अर्बन स्ट्रीट डिझाईन संकल्पनेअंतर्गत नियोजन केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वॉकिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, पथारी व्यावसायिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था, दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था, गार्डन, ई – टॉयलेट आदी प्रकल्प हाती घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र आता व्यापाऱ्यांनी या प्रकल्पात मनमानी होत असल्याचा आरोप केला आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील फूटपाथची रुंदी वाढविली आहे. पुलाखाली पार्किग करण्याचे नियोजन असताना आता हॉकर्ससाठी जागा देण्याचे निश्चित केले आहे. हे प्रकल्पाच्या नावाखाली थोपविले जात आहे, असेही या व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
मनमानी कारभार सुरू आहे, विरोध असताना रेटून नेऊन काम लादले जात आहे. पथारी व्यावसायिकाना उडडाणपुलाच्या खाली जागा देण्याचे नियोजन केले जात आहे. मग प्रस्तावित पार्किंगचे नियोजन कुठे करणार.
– अजित गव्हाणे, माजी स्थायी समिती सभापती…