न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर. २०२०):- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती ( वायसीएम ) रुग्णालयातील शवागृह गेल्या २० ऑगस्टपासून बंद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मृतदेहाची व्यवस्था होत नसल्याने नातेवाईकांची गैरसोय होत आहे. शवागृह न मिळाल्याने चिंचवडच्या रुग्णालयातच तब्बल कोरोनाबाधित मृतदेह ठेवावा लागला. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महापौर उषा ढोरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
मोहनगर, चिंचवड येथील एका रुग्णाचे चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथील कोरोना रुग्णालयात मंगळवारी (दि. ८) रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या नातेवाईकांनी अंत्यविधी – दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ९) सकाळी दहाला करण्याचे ठरविले. त्यामुळे मृतदेह वायसीएमच्या शवागृहात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, शवागृहातील शीतगृह २० ऑगस्टपासून बंद असल्याचे कर्मचाऱ्यांनी उत्तर दिले. शहरातील २ ते ३ खासगी रुग्णालयातही शवागृहात जागा उपलब्ध नसल्याचे समजले.
पुण्यातील ससून व औंध रुग्णालयात जागा असल्याचे सांगण्यात आले. या काळात मृतदेह ऑटो क्लस्टर रुग्णालयातच होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता नेहरूनगर येथे दफनविधी करण्यात आला. वायसीएममधील शवागृहातील शीतगृह बंद असल्याने मृताच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. इतरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी पालिका प्रशासनाने शीतगृह तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी भापकर यांनी केली आहे.