- केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ सप्टेंबर २०२०) :- कोरोनातून बरे झाल्यावर काय काळजी घ्यायची, याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये डिस्चार्ज झाल्यावर सात दिवसांनी डॉक्टरांना भेटणे, मास्क -सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर पाळणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. तसेच, तब्येत ठीक असल्यास घरगुती, कार्यालयीन कामे करता येतील, असे म्हटले आहे.
कोरोना होऊन गेल्यानंतर काय?
कोरोना झाला किंवा कोरोना बरा झाला का, अशी शंका वाटते. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांसाठी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा व शारीरिक अंतर पाळावे. त्यांनी आवश्यकतेनुसार दिवसातून गरम पाणी प्यावे, असे म्हटले आहे. तसेच योगासन, प्राणायाम नियमित करावे. कोरोनातून बरे झाल्यावरही कोरडा खोकला, घसा खवखवणे अशी लक्षणे असल्यास पाण्याची वाफ घ्यावी व गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
ही घ्या काळजी
मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार श्वसनाचे व्यायाम करावेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक औषधे घ्यावीत. सकाळी व संध्याकाळी फिरण्यास जावे. पचायला हलके व ताजे शिजवलेले अन्न खावे. पुरेशी विश्रांती व झोप घ्यावी, सिगारेट, दारू व इतर व्यसने करू नयेत. दररोज तापमान, रक्तदाब, रक्तातील साखर, ऑक्सिजनचे प्रमाण मोजावे.
अनुभव सामाजिक करा
कोरोनातून मुक्त झालेल्यांनी आपले अनुभव समाजमाध्यमावर लिहून सकारात्मक माहिती पसरवावी. तसेच मित्र, नातेवाईक यांची भीती कमी आणि गैरसमज दूर करण्याबाबत समाजप्रबोधन करावे, असे म्हटले आहे. तसेच सामाजिक संस्था, बचत गट, कुशल व्यावसायिक यांचे सहकार्य घ्यावे. आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच समुपदेशकांची योग्य वेळी मदत घ्यावी.
दवाखान्यात कधी जाल?
ज्या दवाखान्यातून आपण कोरोनाचे उपचार घेतले तेथेच शक्यतो सात दिवसांनी डॉक्टरांना दाखवावे. त्यानंतर जवळच्या डॉक्टरकडे जाऊन उपचार घ्यावेत. तसेच ताप कमी होत नसेल, श्वास घ्यायला त्रास होणे, ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, छातीत दुखणे, अशक्तपणा जाणवत असेल तर त्या नागरिकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे म्हटले आहे. ज्या रुग्णांवर घरीच कोरोनाचे उपचार झाले, त्यांना काही कोरोनाची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी तातडीने जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काढा, च्यवनप्राश घ्या
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी त्यांची प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुष औषधे घ्यावीत. त्यामध्ये १५० मिली आयुष काढा व एक चमचा च्यवनप्राश घ्यावा, असे म्हटले आहे. तसेच इतर आयुर्वेदिक औषधे घ्यावीत.


















