- उद्योजक हैराण; कोरोना रुग्णांसोबत आम्हालाही जगवा; शासनाकडे आर्जव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२०) :- कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उद्योगांचा ऑक्सिजन काढून घेण्याचा प्रकार प्रशासनाने केला आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा भाव वीस रुपयांवरून ६० रुपये घनमीटरपर्यंत वाढला आहे. इतके पैसे मोजूनही ऑक्सिजन मिळत नसल्याने उद्योगातील कामे ठप्प पडली आहेत. उद्योग सुरु होऊनही टाळेबंदीचा अनुभव येत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने साथरोग कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत उद्योगांना पुरविण्यात येणाऱ्या ऑक्सिजनवर बंधने घातली आहेत. उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजन केवळ वैद्यकीय कारणासाठी वापरण्याचे बंधन घातले आहे. ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास उर्वरित वीस टक्के ऑक्सिजन देखील वैद्यकीय कारणासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय सात ऑगस्ट रोजी झाला. दुसऱ्या दिवशीच ऑक्सिजनच्या भावामध्ये ३३ टक्के वाढ झाली.
उद्योगांना ऑक्सिजनची नितांत आवश्यकता असते. जवळपास साठ ते सत्तर उद्योगांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. रुग्णांना ऑक्सिजन मिळालाच पाहिजे. मात्र, उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे अन्न आणि औषध प्रशासनाचे ( एफडीए ) अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी ऑक्सिजन वितरकांची तपासणी करीत आहेत. त्यामुळे वितरकांमध्ये देखील धास्ती आहे. परिणामी २० रुपये घनमीटरच्या ऑक्सिजनसाठी ६० रुपये मोजावे लागत आहेत.
– संदीप बेलसरे, अध्यक्ष पिंपरी – चिंचवड लघू उद्योजक संघटना.