न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२०) :- पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, पवना धरणातून से. क्र. २३ जलशुध्दीकरण केंद्र निगडीपर्यंत पाणी आणण्यासाठी थेट पाईपलाईन टाकण्याच्या प्रकल्पासाठी सल्लागार नेमणूकीस आजच्या स्थायी सभेत मान्यता देण्यात आली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना २००८ मध्ये पवना बंदिस्त जलवाहिनीच्या कामास प्रारंभ झाला. या प्रकल्पाला मावळातील भाजप आणि शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यानंतर हा प्रकल्प नऊ वर्षापासून बंद पडला होता. पाणीपुरवठा विभागाने जलवाहिनीचे काम करणाऱ्या एनसीसी-एमसीसी इंदू या ठेकेदारास २४ फेब्रुवारी २०२० रोजी पत्राद्वारे जलवाहिनीचे काम पुन्हा सुरु करण्यासाठी विचारणा केली होती. ठेकेदारानेही त्यास अटी-शर्तीसह प्रतिसाद दिला. त्या अनुषंगाने १५ ऑगस्टला आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात बैठक झाली होती.
आजच्या स्थायी सभेत सल्लागाराच्या नियुक्तीला मंजुरी मिळाली असून, या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी पूर्वतयारी करणे आणि आवश्यकतेनुसार सादरीकरण द्यावे लागणार आहे. अतिक्रमणे, भूसंपादन, ताबा, महामार्ग प्राधिकरण अथवा राज्य रस्ते विकास महामंडळाकडून परवानग्या घेणे, पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या प्रकल्पासाठी ४०० कोटींपेक्षा अधिक खर्च होणार आहे. प्रकल्प पुन्हा सुरु करायचा असल्यास पालिका सर्वसाधारण सभेची मान्यता आवश्यक आहे. तांत्रिक अहवाल तयार करणे आवश्यक आहे. नवीन प्रकल्प अहवाल करण्याची कार्यवाही याच सल्लागाराकडून नवीन सरकारी खर्च दराने करण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.















