न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२०) :- शहरामध्ये वाढता कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांमध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणेकामी सार्वजनिक परिसरामध्ये थुंकणा-या व्यक्तींविरुध्द रक्कम रुपये १ हजार इतका दंड आकारणे यासह पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणा-या सुमारे १५ कोटी २३ लाख रूपयांच्या खर्चास आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुकल्यास आता १५० रुपयांऐवजी १ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यामुळे थुकीबहादरांना जबर आर्थिक चाप बसणार आहे. परिणामी, धुंकण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थूकल्यास १ हजार रुपये दंड करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी महापालिकेस दिल्या. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत रस्त्यावर थुकणाऱ्या नागरिकांना आर्थिक भुर्दंड व्हावा, म्हणून दंडाची रक्कम १ हजार करावी, असा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीसमोर ठेवला होता. यास समितीची मंजुरी मिळाली असून थुकीबहाद्दरांवर १ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे.















