न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२०) :- एका बहिण-भावाने यु ट्युबवर व्हिडिओ पाहून पुण्यातील उत्तम नगर परिसरातील घरातच शंभर रुपयांच्या बनावट नोटा छापल्या व त्या नोटा खपविण्यासाठी भोसरीतील गव्हाणे वस्तीमधील भाजी मंडईमध्ये भाजी खरेदी केली.
भाजी विक्रेत्याला शंभर रुपयांची बनावट नोट दिली. मात्र, नेहमीपेक्षा नोट वेगळी वाटत असल्याने भाजीविक्रेत्याला याचा संशय आला. भाजीविक्रेत्याने विचारले असता बहिणीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील काही महिलांनी तिला पकडून चोप दिला. बहिणीने बेशुद्ध पडल्याचे नाटक केले. त्यामुळे महिला आणि नागरिक घाबरून बाजूला झाले याचा फायदा घेत बहिण तिथून पळून गेली.
आरोपींना नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांच्याकडून शंभर रुपयांच्या ३४ बनावट नोटा, प्रिंटर, कागदी रिम असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुनीता प्रदीप रॉय (वय २२) आणि दत्ता प्रदीप रॉय (वय १८) दोघेही रा. घोटावडे फाटा, पुणे अशी अटक करण्यात आलेल्या बहिण-भावाची नावे आहेत. भोसरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.















