- पालिकेतील विषय समिती सभापतींच्या निवडणुकीस शासनाची मंजुरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :- स्थानिक स्वराज संस्थेतील विविध विषय समिती सभापतींच्या निवडणुका घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या बरखास्त असलेल्या विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, क्रीडा आणि शिक्षण या विषय समिती सभापतींच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील व सर्व स्थानिक स्वराज संस्थेतील निवडणुका व सभापती निवडीस बंदी घातली होती. तसेच, जमावबंदीचा आदेश लागू केला होता. त्यामुळे पालिकेतील विधी, शहर सुधारणा, महिला व बालकल्याण, क्रीडा व शिक्षण समितीची सभापतींची निवडणूक घेता आलेली नाही. परिणामी, या सर्व समितींचा कारभार सध्या सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून सुरु आहे. मात्र, कारभार सुरळीत चालावा म्हणून स्थानिक स्वराज संस्थेतील विविध विषय समिती सभापतींची पदे भरणे आवश्यक झाले आहे. त्या निवडणुका व्हिडिओ कॉन्फरसन्सद्वारे घेण्यात याव्यात, असा आदेश राज्य शासनाचे अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी बुधवारी (दि. ९) काढला आहे. त्यामुळे विषय समितीच्या सभापतींची निवडणूक घेण्यातील अडसर दूर झाला आहे.
या संदर्भात पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले की, शासनाने मान्यता दिल्याने पालिकेतील विषय समिती सभापतींच्या निवडणुका लवकरच घेण्यात येतील. यामुळे समितीचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे.














