न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ सप्टेंबर २०२०) :- केंद्र सरकारने कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व रेल्वेसेवा बंद केली आहे. राजधानी, एक्स्प्रेस रेल्वे, माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे बंद केल्या आहेत. सध्या देशभरात काही विशेष रेल्वे सुरू आहेत. लॉकडाऊनआधी मावळ लोकसभा मतदारसंघात देखील लोणावळा ते पुणे लोकल रेल्वे सेवा सुरू होती. पण, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊमुळे मागील सात महिन्यापासून लोकल सेवा बंद आहे.
सध्या सरकारने मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे. मात्र, पुणे-लोणावळा लोकल बंद असल्यामुळे रेल्वेने कार्यालयात पोहोचणाऱ्या सरकारी कर्मचा-यांचा खोळंबा झाला आहे. लोकल अभावी ते वेळेत कार्यालयात पोहचू शकत नाहीत. त्यांना कार्यालयात जाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे पुणे ते लोणावळा दरम्यान धावणारी लोकल रेल्वे सेवा सरकारने सुरू करावी. जेणेकरून सरकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहचतील. जनतेची कामे आणि देशाची सेवा करतील, अशी मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.














