- अज्ञात चोरट्यांकडून लाखोंचा ऐवज लंपास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून अज्ञात चोरट्यांनी दागिन्यांसह रोकड चोरून नेली. वाकड आणि निगडी येथे अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सची दोन दुकाने फोडल्याच्या घटना रविवारी (दि. २०) सकाळी उघडकीस आल्या. यात चोरट्यांनी नऊ लाख ६६ हजारांचा ऐवज चोरून नेला.
वाकड येथील घरफोडी प्रकरणी जयंतीलाल गुलाबदास वैष्णव (वय ४४, रा. अशोक थिएटरजवळ, पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे वाकड येथे सदगुरु कॉलनी एक येथे पी. आर. ज्वेलर्स हे दुकान आहे. फिर्यादी यांनी शनिवारी रात्री दुकान बंद केले. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारून वायर तोडली. दुकानातून सोन्या चांदीचे दागिने, डीव्हीआर तसेच रोख रक्कम असा एक लाख ६६ हजारांचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घटना आकुर्डी येथील विठ्ठलवाडी रोड येथील श्री नवकार ज्वेलर्स या दुकानात घडली. याप्रकरणी सुरेंद्र फुरटमल पुनमिया (वय ५०, रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांचे श्री नवकार ज्वेलर्स हे दुकान शनिवारी (दि. १९) सायंकाळी सातच्या सुमारास बंद केले. अज्ञात चोरट्यांनी रात्री या दुकानाचे शटर उचकटून दुकानातून आठ लाख रुपये किमतीची चांदी चोरुन नेली.