- महापौर उषा ढोरे यांची पालिका आयुक्तांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, प्रादुर्भाव व रुग्णांचे वाढते मृत्यू लक्षात घेता कोरोना संकटाचा सामना अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोविड-१९ संसर्ग झालेल्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयांमधून यशस्वी उपचार करुन रुग्ण बरे होत आहेत.
या उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी वरदान ठरत आहे. तथापि वाय.सी.एम.रुग्णालयामध्ये प्लाझ्मा जमा करण्यासाठी एकच मशीन असल्याने प्लाझ्मा-दाते व रुग्णाचे नातेवाईक दोघांचीही प्रचंड गैरसोय होत असल्याबाबत संजय गायखे यांनी महापौरांना कळविले आहे.
ही बाब अतिशय गंभीर असून सध्याच्या कोरोनाच्या आपातकालीन परिस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्लाझ्मा जमा करणाऱ्या अधिक मशीन्सची आवश्यकता असून, शहरातील वायसीएम रुग्णालयात प्लाझ्मा मशीनची संख्या वाढविण्याबाबत आयुक्तांनी संबंधितांस आरोग्य यंत्रणेस निर्देश द्यावेत, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.