- भरमसाठ किंमतीत इंजेक्शनची विक्री; पोलिसांच्या कारवाईची नागरिकांना अपेक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. करोना महामारीमुळे अचानक रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. तर, दुसरीकडे या औषधांच्या काळाबाजारास सुरुवात झाली आहे. भरमसाठ किंमतीत इंजेक्शनची विक्री होऊ लागली आहे.
श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांना रेमडीसीवीर इंजेक्शन अत्यंत गरजेचे आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची मुळ किंमत ५४०० रुपये आहे. मात्र अत्यवस्थेत असणाऱ्या कोरोना रुग्णांना ही इंजेक्शन आवश्यक असल्याने याचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
एकीकडे शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर या कोरोनाच्या आडून रुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करून पैसे कमविणारे ही समोर येत आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत नसल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
रेमेडिसिवीर सारख्या कोरोनाग्रस्त रुग्णांना आराम देणाऱ्या औषधांची किंमत सहा ते दहा पट वाढवून या औषधांचा काळा बाजार करणाऱ्या टोळीचा काही दिवसांपूर्वीच मुंबईत पोलिसांनी पर्दाफाश केला होता. पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यात देखील या औषधाचा काळाबाजार करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाई व्हावी, अशी नागरिकांकडून मागणी जोर धरू लागली आहे.