न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०२०) :- आकुर्डी येथील स्टार हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात काम करणारा वार्डबॉय आणि सुरक्षा रक्षक असलेल्या महिलेकडून कोविडवर परिणामकारक ठरणारे इंजेक्शन रेमडेसिवीर चढ्या दराने विकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुस्तफा अब्दुल गफार तांबोळी यांनी निगडी पोलिसांत तक्रार अर्ज दिला असून संबंधित व्यक्तींवर आणि रुग्णालयावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यानुसार निगडी पोलीस चौकशी करत असून यात महिला सुरक्षा रक्षक वैष्णवी टाकुरकर, वॉर्डबॉय शाहिद शेख आणि विजय रांजणे यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.
दरम्यान, स्टार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित वाघ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून रुग्णालयात असा प्रकार घडला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, संबंधित वॉर्डबॉय आणि सुरक्षा रक्षक महिलेला कामावरून काढत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


















