- पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२०) :- पिंपरी – चिंवड महालिकेच्या विविध मिळकतींच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक पुरविणे आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी ट्राफिक वॉर्डन पुरविण्यासाठी सुरक्षा विभागाने निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यात ठेकेदार व अधिकाऱ्यांनी संगनमत करून ‘ रिंग ‘ केली आहे. त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते किशोर तेलंग यांनी केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. पालिकेच्या शहरात शेकडो इमारती आहेत. त्या इमारतीच्या सुरक्षेसाठी कंत्राटी पद्धतीने सुरक्षारक्षक नियुक्त केले जातात. तसेच, वाहतुक पोलिसांच्या मदतीसाठी ट्राफिक वॉर्डन उपलब्ध करून दिले जातात. या कामासाठी ठराविक ३ पुरवठादार संस्था सक्रिय आहेत. त्या ३ संस्था रिंग करून आपल्या मर्जीनुसार अटी व शर्तीचा समावेश करून घेतात. बोगस सुरक्षारक्षक व ट्राफिक वॉर्डन दाखवून पालिकेच्या लाखो रूपयांचा चुना लावत आहेत. त्यात सुरक्षा विभागाचे अधिकारीही सामील आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.
या पुरठादारांची गेल्या ३ वर्षांतील कामकाज तपासून चौकशी करावी. त्यात या कामातील गैरव्यवहार उघड होईल, असे तेलंग यांनी तक्रारीत म्हटले आहे. पालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या या पुरवठादारांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.















