न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२०) :- पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ मोबाईल, सोन्याचे दागिने, दोन दुचाकी, असा चार लाख ४० हजार ५५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. खंडणी दरोडाविरोधी पथकाने ही कामगिरी केली.
राहुल रमेश चव्हाण ( १९, रा. कॉलनी नंबर २, भारतमाता नगर, दिघी), शेखर संभाजी जाधव (२१, रा. मु.पो. मोघा, ता. उदगिर, जि. लातुर), करण गुरुनाथ राठोड (१९, रा. दिघी रोड, भोसरी), कृष्णा संजय तांगतोडे (२०, रा. पुणे फिरस्ता, मुळ रा. रोकडे चाळ, मारूती मंदिराजवळ मु.पो. पाथर्डी, ता. जि. नाशिक), विकी कमल मांझी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिघी येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली. अधिक तपासात आरोपींनी शहर परिसरात घरफोडी, वाहनचोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून दोन लाख ८१ हजारांचे २२ मोबाईल फोन, ७० हजारांचेसोन्याचे गंठण आणि कानातील रिंग, ९ ० हजार ५५० हजारांच्या दोन दुचाकी असा एकूण चार लाख ४० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कामगिरीमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील नऊ जबरी चोरी , दोन घरफोडी, तीन वाहनचोरी असे १४ गुन्हे तर चिखली आणि आळंदी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपी शेखर जाधव याच्यावर उदगीर शहर आणि ग्रामीण तसेच भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. कृष्णा तांगतोडे याच्यावर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर, सिन्नर आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. करण राठोड याच्यावर भोसरी ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विकी मांझी याच्यावर एमआयडीसी भोसरी आणि भोसरी ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.















