न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२०) :- शहरामध्ये दुचाकी चोर धुमाकूळ घालत असताना चाकण पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास चोरीची दुचाकी विकण्याच्या प्रयत्न करताना अटक केले. त्याच्याकडून सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अजय गायकवाड असे त्या सराईताचे नाव आहे.
दुचाकी चोरीचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांना एक व्यक्ती चोरीची गाडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. त्या नुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी भामा नदी जवळील उद्यानाच्या परिसरात सापळा रचला. त्यावेळी चोरीची दुचाकी घेऊन आलेला आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
आरोपीने चाकण, शिक्रापूर आणि भोसरी परिसरातून सहा गाड्या चोरल्याची कबुली दिली. गाड्या चोरल्यानंतर त्या वाकी खुर्द येथील पायस हायस्कूल जवळील डोंगरात झुडपात लपविल्या होत्या. या गाड्या हस्तगात केल्या आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर मोबाइल हिसकावून नेल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय जगदाळे यांनी दिली.















