- भाजपची दडपशाही चालवून देणार नाही – संजोग वाघेरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- भारत देश हा लोकशाही व्यवस्था मानणारा देश आहे. मात्र उत्तर प्रदेश भाजपच्या योगी सरकारची दडपशाही देशातील सामान्य नागरिक कधीही खपवून घेणार नाही. हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली, तसेच त्यांना अटक करण्यात आली, ही भाजपची दडपशाही चालणार नाही, अशा शब्दांत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी भाजपावर टीका केली आहे.
“उत्तर प्रदेशात कायद्याचे नाही तर गुंडाराज आहे हे आज झालेल्या कृत्यामधन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उत्तर प्रदेशात महिला व मुलींच्या अब्रूचे धिंडवडे काढले जात आहेत. दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे देशात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न असताना हाथरस येथील अमानवीय घटनेने पुन्हा महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील आरोपींनी पाठीशी घालण्याचा प्रयत्न उत्तर प्रदेशमधील भाजप सरकार करत आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना हाथरस घटनेतील पीडित कुटुबियाना भेटू दिले नाही. उलट पोलिस बाळाचा वापर करून काँग्रेसचे राहुल गांधी यांना अटक केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पीडित कुटुंबियांच्या तसेच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. भाजपा सरकारच्या दडपशाहीला आम्ही भीक घालत नाही. पीडित कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत देशातील सामान्य नागरिक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे अमानवी व हुकुमशाही योगी सरकार विरोधात वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असेही वाघेरे यांनी म्हटले आहे.















