न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- आपल्यापेक्षा लहान वयाच्या व्यक्तीने ‘ ए बाळा ‘ म्हटल्याने झालेल्या वादात दोघांना सिमेंटच्या पत्र्याने मारहाण केल्याची घटना तळवडे येथे घडली. याप्रकरणी तिघा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
विकास अनिल शिंदे (वय ३२, रा. मुक्ताई गार्डनजवळ, यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. मोहसीन युसुफ तांबोळी (वय २२, रा. श्रीराम को. रुपीनगर, तळवडे) आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रुपीनगर तळवडे येथील सोनिग्रा मैदानात फिर्यादी शिंदे, त्यांचा मित्र केतन कोल्हे आणि दिगंबर मधुकर मानकरी (वय ३०) तीस सप्टेंबरच्या मध्यरात्री मद्यपान करीत होते.
त्यावेळी तांबोळी याने शिंदे यांना ए बाळा असे म्हणून हटकले. त्यावर शिंदे यांनी तू आमच्या वयाचा नाही. नीट बोल. आता येथून जा असे सांगितले. त्याचा राग आल्याने त्याने दोन साथीदारांसह येऊन शिंदे यांच्या डोक्यात सिमेंटचा पत्रा घालून जखमी केले. मानकरी यांना देखील डोळ्यांच्या खाली जखम झाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या या मारहाणीमुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.















