न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- राज्य सरकारने रेडरिकनरच्या दरामध्ये वाढ केल्याने पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने भूखंड व सदनिका वाटप आणि हस्तांतरणाच्या दरामध्ये वाढ केली आहे. दोन वर्षानंतर प्राधिकरणाच्या हस्तांतरणाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने येथील निवासी, औद्योगिक व व्यापारी भूखंड महागणार आहेत.
भूखंड वाटप व हस्तांतराच्या दरामध्ये प्रति चौरस मीटरमागे सरासरी एक ते दोन हजारांची वाढ करण्यात आली आहे. औद्योगिक भूखंडांच्या दरात प्रति चौरस मीटरमागे तीन हजारांपेक्षा अधिक दरवाढ केली आहे. मध्यवर्ती सुविधा केंद्रातील व्यापारी भूखंडांसाठी प्रति चौरस मीटरमागे तीन ते चार हजारांपेक्षा जादा रक्कम मोजावी लागणार आहे.
चिखली , आकुर्डी , भोसरी आणि वाकड मध्यवर्ती सुविधा केंद्रातील निवासी भूखंडाचे वाटप व हस्तांतराचे दर एक ते तीन हजार तर व्यापारी भूखंडाच्या हस्तांतर दरामध्ये सरासरी अडीच ते साडेपाच हजार प्रति चौरस मीटर इतकी दरवाढ केली आहे. प्राधिकरणाकडून बांधण्यात येऊन विक्री केलेल्या सदनिका व दुकाने / दालने यांच्या हस्तांतरणाच्या दरातही वाढ केली आहे. ५० चौरस मीटरपर्यंतच्या निवासी गाळ्यांसाठी ६४५ तर, ५० चौरस मीटरपेक्षा जास्त असलेल्या गाळ्यांसाठी १ हजार २९० रुपयांची दरवाढ आहे. व्यापारी गाळ्यांमध्ये ५० चौरस मीटरपर्यंतच्या गाळ्यांसाठी १ हजार २९० तर, ५० चौरस मीटरपुढील गाळ्यांहीमध्ये वाढ झाली आहे.


















