न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑक्टोबर २०२०) :- कंपनीच्या सुरक्षा रक्षकांच्या पगारातून पैसे कापून घेतल्याबाबतची चौकशी सुरु असताना सुपरवायझरने कंपनी मालकाला आत्महत्या करत असल्याची धमकी दिली असल्याचा व्हिडीओ आणि चिठ्ठीचा फोटो कंपनी मालकाच्या फोनवर व्हाट्सअॅपवर पाठवला.
याबाबत सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. ३०) रात्री साडेबारा वाजता घडली. वैभव रंगनाथ साठे (वय ३२, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आरोपी सुपरवायझरचे नाव आहे. याप्रकरणी इंद्रजीत महावीर चौगुले (वय ३८, रा. मासुळकर कॉलनी, पिंपरी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी वैभव साठे हा फिर्यादी यांच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपनीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या पगाराचे पैसे फिर्यादी यांनी दिले होते. सुरक्षा रक्षकांच्या पगारातील काही पैसे आरोपी साठे याने स्वता:कडे ठेवून घेतले. याबाबत सुरक्षा रक्षकांनी चौगुले यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची रीतसर चौकशी सुरु आहे. दरम्यान बुधवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास साठे याने चौगुले आणि अन्य काही जणांना व्हाटसअॅपवर आत्महत्या करीत असल्याचा व्हिडीओ आणि लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो काढून पाठवला.















