- व्यवस्थापनाकडून गर्दी टाळण्यासाठी होतायत जुजबी प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ ऑक्टोबर. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे नियम व गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सणासुदीमुळे शहरातील सोन्याच्या दुकानात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. चिंचवडगावातील दिलीप सोनिगरा ज्वेलर्समध्येदेखील सोने खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागल्याचे पहावयास मिळत आहे.
मात्र, या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी व्यवस्थापनाकडून जुजबी प्रयत्न होताना दिसून येत आहेत. मास्क परिधान केलेल्या व्यक्तींना सॅनिटायझर व त्यांचे तापमान तपासून खरेदीसाठी दुकानात प्रवेश दिला जातोय. मात्र ग्राहकांना आत प्रवेश दिल्यानंतर गर्दी होऊ नये यासाठी कोणतीच उपाययोजना होताना दिसून येत नाही.
वेढणीसाठी आलेले ग्राहकसुद्धा रांगेत व एकमेकांपासून दूर न राहता, कोणतेही सुरक्षित अंतर न ठेवता, गर्दी करताना आढळून येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी केवळ जुजबी यंत्रणा राबवून, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचा प्रकार या दुकानात पहावयास मिळत असल्याचा अनुभव ग्राहक सांगत आहेत. अशाने कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो, अशी भीती जाणकार नागरिक वर्तवू लागले आहेत.


















