न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने निगडी ते देहूरोड मार्गावर उभारलेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. रस्त्यावरील दिशादर्शक फलक व पट्टे रंगविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर महापौर उषा ढोरे यांच्या परवानगीने तो मार्ग वाहतुकीस खुला केला जाईल, असे महापालिकेच्या बीआरटी स्थापत्य विभागाचे प्रवक्ते विजय भोजने यांनी सांगितले.
निगडीच्या भक्ती – शक्ती समूह शिल्प चौकात उउड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. त्यातील निगडी ते देहूरोड उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने तो वाहतुकीस खुला करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. या मागणीसाठी नुकतेच आंदोलन करण्यात आले.
याबाबत विचारले असता पालिकेचे भोजने यांनी सांगितले की, महापौर ढोरे यांनी उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याबाबतच्या सूचना महिनाभरापूर्वी दिल्या होत्या. त्यानुसार वेगात कामे पूर्ण केले जात आहे. पाऊस थांबल्याने देहूरोडकडील बाजूच्या रॅम्पचे डांबरीकरण गुरुवारी (दि. १) पूर्ण करण्यात आले आहे. उड्डाणपुलावर दिशादर्शक फलक व पट्टे रंगविण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर महापौर ढोरे यांची परवानगी घेऊन रस्ता वाहतुकीस खुला केला जाईल. त्यामुळे वाहनचालकांना वळसा मारून ये – जा करण्याच्या त्रासातून मुक्तता होणार आहे.


















