- बिजलीनगर अंडरपासच्या कामाची मुदत संपूनही काम अर्ध्यातही नाही…
- भाजप पक्षनेत्याच्या प्रभागातच दूरावस्था..
- शिवसेनच्या संतोष सौंदणकरांकडून पक्षनेत्यांचा बुरखाफाड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- चिंचवडमधील बिजलीनगर ते गुरूद्वारा चौक अंडरपासचे काम गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडले आहे. त्याचा वाहतुकीला प्रचंड त्रास होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पक्षनेत्यांच्या प्रभागातच अशी अवस्था असेल तर संपूर्ण शहराला भाजपकडून कसा न्याय मिळणार? असा प्रश्न शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी उपस्थित केला आहे. भाजपचा कारभार म्हणजे ‘स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुस-याचे बघायचे वाकून’ अशा प्रकारचा असल्याचा आरोपही सौंदणकर यांनी केला आहे.
बिजलीनगर ते गुरूद्वारा चौकातील (प्रभाग क्रमांक २०) वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१८ मध्ये बिजलीनगर ते गुरुद्वारा चौक अंडरपासचे काम सुरू आहे. अद्यप ते अर्धवट स्थितीत आहे. स्थायी समितीच्या आदेशानुसार काम पूर्ण करण्याची कालमर्यादा मार्च २०२० होती. परंतु, हे काम अद्याप ५० टक्के देखील पूर्ण झालेले नाही. गेली दोन वर्षे निगडी प्राधिकरण – रावेतला जोडणारा मुख्य रस्ता या कामानिमित्त वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग शोधत गल्लीबोळातून वाहतूक करावी लागते. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

या मुख्य रस्त्यावर बकालपणा असल्याने पीएमपीएल बससेवा बंद आहे. कामगारांच्या कंपनी बससेवा, मुलांची शाळेची बससेवा या मार्गावर बंद आहे. या रस्त्यालगत असणारे छोटे मोठे दुकानदार, व्यावसायिकांचे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. अशा परिस्थितीत करदात्यांचे करोडो रुपये खर्च करून अंडरपासचे काम होत आहे. ३ मार्च २०१८ रोजी मे कृष्णाई इन्फ्रा प्रा. लि. या कंत्राटदार संस्थेला कामाचे आदेश देण्यात आले. २०२० मध्ये हे काम पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तरी देखील ठेकेदार हे काम पूर्ण करण्याचे नाव घेत नाही.
हा प्रभाग महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पक्षनेत्यांचा आहे. शहराचे नेतृत्व या प्रभागातील नगरसेवकाकडे असताना त्यांच्याच बुडाखाली अंधार असल्याचे दिसत आहे. पक्षनेत्यांचे स्वतःच्या प्रभागातच लक्ष नाही, संपूर्ण शहराचे नेतृत्व करणे त्यांना कसे शक्य होईल, असा सवाल देखील सौंदणकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
- पक्षनेते स्वतःच्या प्रभागातील बकालपणा हटवा…
सत्ताधारी भाजप पक्षनेत्यांचे लक्ष स्वतःच्या प्रभागात नाही. त्यांना अन्य नगरसेवकांच्या प्रभागात रुची दिसते. प्रभाग क्रमांक २५ मधील विकासकामांकडे पक्षनेत्यांचे अधिक लक्ष दिसते. त्यांनी स्वतःच्या प्रभागात लक्ष घालून निर्माण झालेला बकालपणा हटवावा. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्य प्रभागातील नगरसेवक तेथील नागरिकांची कामे करण्यासाठी सक्षम आहेत, असा टोला शिवसेनेचे संतोष सौंदणकर यांनी लगावला आहे.















