न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेअंतर्गत शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू आहे. हे काम स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका करीत आहेत. त्यांना महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांप्रमाणे १ कोटी रुपये रकमेचे सुरक्षा विमा कवच योजनेचा लाभ दिला जावा, असा ठराव स्थायी समितीने बुधवारी (दि. ७) मंजूर केला आहे.
जबाबदारी पार पाडत असताना अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांचा प्रत्यक्ष कोरोनाबाधित रुणांशी संपर्क येत आहे. त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांवर मात करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ मिशन अंतर्गत ‘पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज इन्शुरन्स स्किम फॉर हेल्थ वर्कर फाईटींग कोविड -१९’ या योजनेत १ कोटी रुपयांचे सुरक्षा कवच देण्याचा ठराव महापालिका सर्वसाधारण सभेने २६ ऑगस्ट २०२० ला मंजूर केला आहे.
या योजनेचा लाभ पालिका आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी, पालिकेकरीता सेवा देणारे कर्मचारी, कंत्राटी, आऊट सोर्सद्वारे घेतलेले कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी, मानधनावरील कामगारांना दिला जाणार आहे. या सुरक्षा कवच योजोना लाभ ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत सर्वेक्षण करणाऱ्या स्वयंसेवक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना दिला जाणार आहे.


















