- मृताच्या नातेवाईकांने नेहरुनगरच्या जम्बो कोविड केअर सेंटरवरला ठरविले दोषी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- कोरोनायोद्धा असलेल्या एका डॉक्टरला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. औषधोपचाराची माहिती न देता योग्य उपचार केले नाहीत. तसेच त्यांच्या तपासणीचे रिपोर्ट दडवून ठेवले. त्यामुळे प्रकृती खालावून रुग्ण दगावला, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
यंत्रणेच्या ढिसाळपणा याला जबाबदार असल्याचे सांगून नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. डॉ. कृष्णा आल्हाट (वय ५४, रा. बालाजीनगर, करंडेवस्ती, राजगुरुनगर, ता खेड), असे मृत रुग्णाचे नाव आहे.
डॉ . कृष्णा हे पाच – सहा वर्षापासून १०८ रुग्णवाहिका सेवेत कार्यरत होते. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना १५ सप्टेंबरला पिंपरीतील नेहरुनगर येथील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असताना त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय झाला. जम्बो कोविड केअर सेंटर येथून त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, बुधवारी (दि. ७) सायंकाळी सातच्या सुमारास डॉ. कृष्णा आल्हाट यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
माझे पती डॉ.कृष्णा यांच्यावर जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असताना काही औषधे आम्ही बाहेरुन पुरविली. असे असतानाही उपचाराबाबत पूर्ण माहिती आम्हाला दिली नाही. तसेच विविध वैद्यकीय रिपोर्ट आम्हाला देणे आवश्यक असताना ते दिले नाहीत. यंत्रणेने वेळीच माहिती दिली असती व सहकार्य केले असते तर, योग्य उपचारांसाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असते. – डॉ. नीता आल्हाट















