- राज्य सरकारकडून अनेक मागण्या मान्य झाल्याचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२०) :- मराठा आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने स्थगिती दिल्याचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रतिनिधिंनी या विषयावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतरच बंद मागे घेण्यात येत असल्याची घोषणा सुरेश पाटील यांनी केली. सरकारने आमच्या अनेक मागण्या मान्य केल्याने आम्ही उद्याचा बंद मागे घेतोय असं सुरेश पाटील यांनी सांगितलं आहे.
या परिषदेला राज्यातील अनेक मराठा संघटनांचे नेते आणि प्रतिनिधींची उपस्थिती होती. यावेळी १५ ठराव मंजूर करण्यात आले. “सरकारने ठरावांची अमलबजावणी केली नाही तर १० तारखेनंतर थोबाड फोडो आंदोलन करू,” असा इशारा यावेळी देण्यात आला होता.


















