न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ डिसें.) :- शिवसेना पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झालेली आहे. या नियुक्तीबाबत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्यावतीने नियुक्तीपत्रक काढण्यात आलेले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पिंपरी विधानसभेच्या ”विधानसभा समन्वयकपदी” पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेचे जेष्ठ नेते विजय गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विजय गुप्ता हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदीच्या काळापासून शिवसेनेत सक्रिय आहेत. शहरातील उत्तर भारतीयांची मोट बांधून त्यांना शिवसेनेच्या पंखाखाली एकत्र बांधून ठेवण्याची किमया विजय गुप्ता यांनी साधलेली आहे. उत्तर भारतीयांच्या एकजुटीचा पक्षाच्या कार्यात मोठा हातभार लागत असल्याचा प्रत्यय दिसून येतो. विजय गुप्ता यांचा पिंपरी चिंचवड शहरात शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवण्यात मोलाचा वाटा असून, मावळचे मा. खासदार गजानन बाबर यांची शिवसेनेचे प्रथम नगरसेवक होण्यामागेही गुप्ता यांचा मोठा वाटा आहे.
विजय गुप्ता हे ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनचे प्रदेश खजिनदार तर उत्तर भारतीय छट पूजा समितीचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्षही आहेत. हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष या नात्याने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पडणार असून, पुन्हा एकदा पिंपरी विधानसभेवर भगवा फडकवणार असल्याचा मनोदय विजय गुप्ता यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना व्यक्त केला आहे.