- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शहर राष्ट्रवादीला चिमटा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ ऑक्टोबर २०२०) :- विरोधी पक्षांनी आत्तापासून गणपतीसमोर सुप-या ठेवल्या आहेत. गल्ल्या-गल्यांमध्ये ते फिरत आहेत. त्यांना दाखवून द्या की संकल्प करुन काही होत नाही. मात्र एवढे करूनही सत्तेत भाजपच असणार आहे, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शहर राष्ट्रवादीला लगावला आहे.
चालू पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विजयाला आज (दि. २४ ऑक्टोबर ) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार लांडगे आणि आमदार जगताप यांचा पिंपळे सौदागर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्रदेश सदस्य एकनाथ पवार व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. २०२२ मध्ये या निवडणुका पार पडणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या प्रभागनिहाय बैठका सुरु आहेत. मागील वेळी पालिकेतील सत्ता गेल्याने राष्ट्रवादीने यावेळी कंबर कसली आहे. राज्यात सत्ता असल्याने नेते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलेला दिसून येत आहे. ही निवडणूक म्हणजे मोठे शिवधनुष्य आपल्यासमोर असून ते पेलायचे आहे, असेही चंद्रकात पाटील यांनी यावेळी सांगितले.












