- आ. लांडगे व जगताप यांच्या आयुक्तांना सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणारा प्रतिदिन १२० दशलक्ष लिटर क्षमतेच्या “ मैलासांडपाणी पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण ‘ प्रकल्प तातडीने मार्गी लावा. त्यामुळे एमआयडीसी भागातील १०० एमएलडी शुद्ध पाणी शहरातील नागरिकांना उपलब्ध होईल, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे व आ. लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सांगितले.
पालिकेच्या वतीने मैलासांडपाणी केंद्रातून प्रक्रिया करून सोडले जाणारे पाणी शहरातील औद्योगिक, व्यापारी व निवासी भागात पुरविले जाणार आहे. या प्रकल्पाचा आरखाडा तयार झाला आहे. त्यासाठी ६५४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
शहरातील विकासकामांना चालना द्या. ती वेळेत पूर्ण करा, अशी सूचना दोन्ही आमदारांनी केल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. मैलासांडपाणी पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असून, स्थायी समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यामुळे शहराला अतिरिक्त पाणी मिळणार आहे. त्या बाबतही आमदारांनी सूचना केल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.


















