- भाजपच्या अमित गोरखे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- सन २०२०-२१ इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रिया तातडीने चालू करण्याची मागणी भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोरखे यांनी निवेदनपर पत्र पाठवले आहे.
त्यात म्हटले आहे की, इयत्ता दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी कोविड १९ मुळे विलंब लागला आहे. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन सन २०२०-२१ या वर्षाकरिता इयत्ता ११ वीची प्रवेश प्रक्रियाही उशिरा चालू झाली व आता ही प्रवेशप्रक्रिया थांबविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून मानसिकरित्या त्यांचे खच्चीकरण होत आहे.
११ वीच्या प्रवेशास दिलेली स्थगिती कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असली तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनानेच पुढाकार घेत लक्ष घालावे व प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, असे गोरखे यांनी पत्रात म्हटले आहे.


















