- नागरिकांनो विकासकामांना नाहक विरोध करू नका; महापौर ढोरेंचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. ऑक्टोबर २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने सांगवीतील मधुबन कॉलनी येथे १२ मीटर रुंदीचे रस्ते ताब्यात घेऊन मोजणी करण्यास मंगळवारी (दि.२७) सुरुवात झाली. त्यासाठी पालिका प्रशासनाने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
मधुबन कॉलनीत मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णवाहिकेसह अग्निशामक दलाचा बंबही ये – जा करू शकत नाही. परिणामी मोठी दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी मदतकार्य पोचणेदेखील अशक्य होईल, ही शक्यता लक्षात घेता डीपी आराखड्यानुसार पेट्रोल पंपपासून मधुबन कॉलनी असा १२ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी माजणास सोमवारी सुरूवात झाली. रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारी घरे व बांधकामे हटविली जाणार आहेत.
या संदर्भात महापौर उषा ढोरे म्हणाल्या की, विकासकामांच्या आड येणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांसह पालिका आयुक्तांनी दिले आहेत. विरोध मोडून काढून कोणत्याही परिस्थितीमध्ये विकासकामे केली जातील. त्याला नाहक विरोध करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच, नागरिकांची दिशाभूल करू नये. सुज्ञ नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये.


















